वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात गेली दोन दिवस सर्वत्र ढगाळ हवामानाबरोबरच धुके पडत असून, रात्रंदिवस रिमझिम पाऊस पडत असल्याने आंबा, द्राक्ष बागांंसह रब्बी हंगामातील फुलोऱ्यात आलेली ज्वारी, हरभरा, गहू आदी पिके संकटाच्या भोवऱ्यात सापडल्याने, नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
खरीप हंगामाचा धोका पचवलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःला सावरत उसनवारी करून, झालं गेलं गंगेला मिळालं, असं म्हणत काळजावर दगड ठेवून रब्बी हंगामातील पिकांवर लक्ष केंद्रित केले. परंतु मागील पंधरवड्यापासून सातत्याने बदलणारे लहरी व दूषित वातावरण शेतीच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे अगोदरच संकटाने पिचलेला शेतकरी अजून संकटात अडकला आहे. बुडत्याचा पाय खोलात, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, शेणवडी, पळसावडे, देवापूर, काळचौंडी, जांभुळणी, हिंगणी आदी गावांसह गेल्या तीन ते चार वर्षांपासून आंब्याचे लागवड झालेली आहे. माण तालुक्याच्या पूर्व भागात साधारणतः ६०० एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. सध्या द्राक्षे घडांनी बहरून, मण्यांंमध्ये साखर भरत चालली आहे. येथील शेतकरी कित्येक वर्षांपासून द्राक्षापासून उच्च प्रतीचा निर्यातक्षम बेदाणाही तयार करत असतात; मात्र गेल्या दोन दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलाने शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले आहे. चार-पाच दिवसांपासून ढगाळ हवामान राहिल्याने दाट धुके पडत आहेत. दोन दिवसांंपासून रात्रंदिवस पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे द्राक्षघडात पाणी साचून बागेवर दावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. संततधार पावसाने द्राक्षांच्या मण्यास तडे जाण्याचेही प्रकार घडू लागले आहेत. शिवाय घडात पाणी साचून कुजवा रोग पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्वाचा परिणाम होऊन द्राक्ष उत्पन्नात किमान ३५ ते ४० टक्के घट होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. आंबा बागांवरही धुकट व पावसाळी हवामानाचा परिणाम झाला आहे. मोहरांनी बहरलेल्या आंब्याच्या झाडावर कुजवा रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळधारणा होण्यापूर्वीच मोहर पावसाने कुजून, गळून पडत असल्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसाचा बहरात आलेल्या ज्वारीच्या पिकांवरही परिणाम जाणवू लागला आहे. ढगाळ व धुकट हवामानाबरोबरच रिपरिप पाऊस पडल्यामुळे फुलोऱ्यात आलेल्या ज्वारीच्या कणसांंवर विपरित परिणाम होत आहे. रिमझिम पावसामुळे कणसावरील फुलोरा झडून गेल्याचा प्रकार घडला आहे. कणसात दाणे भरू शकणार नसल्याने ज्वारीच्या उत्पन्नातही घट होणार आहे.
कोट :
गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक होणारा वातावरणातील बदल, सकाळचे पडत असलेले धुके आणि दोन दिवस रात्रंदिवस पडत असलेला रिमझिम पाऊस द्राक्षबागांसाठी अत्यंत घातक ठरणारा आहे. सध्या मण्यात साखर भरत चालली आहे. वातावरण निवाळले नाही, तर द्राक्षबागांवर दावण्या, कुजवा, बुरशी आशाप्रकारचे अनेक रोग पडून,उत्पादनात घट होऊन लाखोंचे नुकसान होणार आहे.
- गुलाबराव माने, द्राक्षबागायतदार, काळचौंडी, ता. माण
फोटो..
०८वरकुटे मलवडी