सातारा : जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाला आहे. भविष्यात पिकांना पाणी कमी पडण्याच्या शक्यतेमुळे शेतकरी द्विधावस्थेत अडकले आहेत. यामुळे आतापर्यंत फक्त ६० टक्के म्हणजे सवा लाख हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. तर गतवर्षी नोव्हेंबरअखेर ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख पीक हंगाम घेण्यात येतात. यातील खरीप हंगाम मोठा राहतो. खरीपातील जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार हेक्टर होते. तर आता रब्बीची पेरणी सुरू झाली असून २ लाख १३ हजार २०९ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्वारी क्षेत्र सर्वाधिक राहते. यंदा ज्वारीचे क्षेत्र १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर असून यानंतर गहू ३७ हजार हेक्टरवर, हरभरा २७ हजार ७५३, मका १० हजार २०९ हेक्टर क्षेत्र राहणार आहे. पण, आतापर्यंतच्या पेरणीचा विचार करता ज्वारीची सुमारे ९५ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. पेरणीचे हे प्रमाण ७० टक्क्यांवर आहे. तर गव्हाची १२ हजार ४४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण ३३ टक्क्यांवर जाते. आणखी काही दिवस गव्हाची पेरणी चालणार आहे. त्यामुळे गव्हाच्या पेरणीत वाढ होऊ शकते. त्याचबरोबर हरभऱ्याची पेरणी सुमारे ११ हजार हेक्टरवर झाली असून हे प्रमाण ३९ टक्क्यांच्या आसपास आहे. मकेचीही पेरणी ७८ टक्के झाली आहे. शेतकऱ्यांनी ८ हजार हेक्टरवर मका पेरणी केली आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवसचे क्षेत्र कमी राहते.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर झालेला दिसून येत आहे. कारण, पेरणीसाठी ओल कमी असणे, पेरणी केल्यास पिकांना पाणी कमी पडणार अशी भीती शेतकऱ्यांत कायम आहे. त्यामुळेच पेरणी इजुनही ६० टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. तर गतवर्षी नोव्हेंबरअखेर रब्बीची पेरणी ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. गतवर्षीपेक्षा यंदा रब्बी पेरणीचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी आहे. आता पेरणीचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे पेरणी कुठपर्यंत पोहोचणार याकडे कृषी विभागाचे लक्ष लागलेले आहे.
प्रमुख रब्बी तालुक्यात यंदा पेर कमीच..रब्बीतील सर्वाधिक क्षेत्र हे माण तालुक्यात ४६ हजार हेक्टरवर आहे. तर यानंतर फलटण ३१ हजार, खटाव ३० हजार हेक्टर राहते. कोरेगाव तालुक्यातही २१ हजार हेक्टरवर क्षेत्र आहे. या तालुक्यात रब्बी पेरणी कमी झालेली आहे. माणमध्ये आतापर्यंत २७ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून हे प्रमाण ५८ टक्के इतके आहे. तर खटाव तालुक्यात ६७ टक्के पेरणी झाली आहे. २० हजार हेक्टरवर पीक घेण्यात आले आहे. फलटणला १२ हजार ५०० हेक्टरवर पेरणी झाली. टक्केवारीत हे प्रमाण ४० च्या वर गेलेले आहे. कोरेगावला १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून याचे प्रमाण ६६ टक्के आहे. तर सातारा तालुक्यात ७८ टक्के, जावळी ६० टक्के, पाटण ७६, कऱ्हाड ४३, खंडाळा तालुक्यात ५८, वाई ५७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९७ टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे.