सातारा : शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटाचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना राबविण्यात येत असून गेल्यावर्षीपासून तर शासनाने एक रुपयात शेतकऱ्यांना विमा देऊ केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातही दुष्काळाच्या भीतीमुळे जिल्ह्यातील सुमारे ४४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. विविध कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
शेती करणे हे जोखमीचे ठरले आहे. कारण, पिके आणि फळबागा घेतल्यानंतर विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग आदी कारणाने शेतीचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिके आणि फळबागांसाठी भरपाई मिळते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही काही वाटा यामध्ये असायचा. मात्र, गेल्यावर्षी खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला. एक रुपया भरुन शेतकऱ्यांना पिकाचा विमा उतरवता येत आहे. खरीपनंतर आता रब्बी हंगामासाठीही एक रुपयात ही विमा योजना सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे.
रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग, कांदा या पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली. यामधील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा या पिकांची विमा योजनेची मुदत संपलेली आहे. तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत विमा उतरवता येणार आहे. आतापर्यंत ४५९ कर्जदार तर बिगर कर्जदार ४३ हजार ५१६ शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला आहे. भुईमुगासाठी आणखी मुदत असल्याने विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. तरीही यावर्षी रब्बीत पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढलेला आहे.
अशी आहे संरक्षित रक्कम (हेक्टरी)पीक संरक्षित रक्कम
गहू बागायत ३० हजार रुपयेज्वारी बागायत २६ हजार
ज्वारी जिरायत २० हजारहरभरा १९ हजार
उन्हाळी भुईमूग ४० हजाररब्बी कांदा ४६ हजार
२० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित...
रब्बी हंगामात पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची संख्या यंदा वाढली आहे. यावर्षी विविध पिकांचे ११ हजार ९९१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आलेले आहे. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक १३ हजार ५२१ हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर फलटण ३ हजार ४४५, हेक्टर, खटाव १ हजार ८२६ हेक्टर आहे. तसेच माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी रबबी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे.