सातारा : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह यांच्या उमेदवारीला महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या रामराजेंनी विरोध केला असतानाच आता त्यांचे बंधू रघुनाथराजेंनी तर युतीधर्म पाळणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे माढ्यात आणखी वेगळे राजकारण सुरू झाले आहे.
महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आहेत. रामराजे हे फलटणचे. तसेच भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही फलटणचे रहिवासी. त्यामुळे तालुक्यातील राजकारणात दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक. आता दोघेही महायुतीत असलेतरी रामराजेंनी उमेदवारी मिळण्याच्या पूर्वीपासूनच रणजितसिंह यांना विरोध केला होता. तर उमेदवारीनंतर उठाव करत अकलूजचे मोहिते-पाटील यांना बरोबर घेत राजकीय हालचाली केल्या. अजूनही रामराजेंचा रणजितसिंह यांच्या उमेदवारीला विरोध कायम आहे. अशातच रामराजेंचे बंधू रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी युतीधर्म पाळणार नसल्याचे स्पष्ट करत माढ्यात महायुतीचा तिढा वाढवलाय.
भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक राहिलेले धैर्यशील मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांना माढ्याची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी अकलूज येथे मोहिते-पाटील यांच्या कार्यक्रमाला रघुनाथराजे गेले होते. त्यावेळी त्यांनी आम्ही युतीधर्म पाळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे माढ्यात महायुतीत आणखी तिढा वाढणार आहे.