रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसराला शनिवारी जोरदार पावसाने सुमारे दीड तास झोडपून काढले. पावसाची चातकासारखी वाट पाहणारा शेतकरी दमदार पावसाने सुखावला आहे.
ऐन पावसाळ्यात एखादी दुसरी हलकी सर वगळता गेल्या पंधरा दिवसांपासून रहिमतपूर परिसरात पावसाने उघडीप दिली होती. पाण्याअभावी सोयाबीन, घेवडा, कडधान्य आदी कोवळी पिके सुकू लागली होती. कडक उन्हाबरोबरच उकाड्याने त्रासलेला शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत बसला होता. शनिवारी सकाळी कडक ऊन पडले होते. आकाशात तुरळक ढग दिसत होते. दुपारी अडीचच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी झाली आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. हलक्या सरी कोसळत सुरू झालेल्या पावसाने काही वेळातच जोरदार कोसळण्यास सुरुवात केली. सुमारे दीड तास झालेल्या जोरदार पावसाने तहानलेल्या पिकाबरोबरच जमिनीची तहान शमविली. पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे पाण्याचे शेतातून लोट वाहत होते. सखल भागात पाणी साचले होते. तसेच शेतातही पाणी तुडुंब भरले होते. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. रहिमतपूरसह परिसरातील साप, वेळू, बेलेवाडी, अपशिंगे, अंभेरी, वेलंग, पिंपरी, कण्हेरखेड, जयपूर, पवारवाडी, धामणेर, दुघी, वाठार, किरोली आदी गावात दमदार पाऊस कोसळला आहे.
फोटो : १०रहिमतपूर
रहिमतपूर येथे शनिवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकात पाणी साचले आहे. (छाया : जयदीप जाधव)