रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुचाकींवरून व रस्त्याने विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या १५२ लोकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ३० हजार ४०० रुपये वसूल केले आहेत. दरम्यान, रहिमतपुरातील गल्लोगल्लीत गटागटाने बसून गप्पांचा फड भरविणाऱ्या युवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून चांगलीच ठोकाठोकी केली.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरासह जिल्हाभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी एकाच दिवसांत रहिमतपुरात तब्बल ३४ कोरोनाबाधित आढळले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी इतर प्रशासकीय यंत्रणेबरोबर पोलीस दलही ठोस पावले उचलत आहे. विनामास्क रस्त्यावरून व दुचाकींवर फिरून कोरोना विषाणूला आमंत्रण देणाऱ्यामुळे संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी गेल्या दहा दिवसांत रहिमतपूर येथील गांधी चौक, बसस्थानक परिसर, चांदणी चौक, आदर्श शाळा चौक, कोरेगाव चौक आदी ठिकाणी रस्त्याने पायी फिरणाऱ्या व दुचाकीवरून विनामास्क फिरणाऱ्या १५२ लोकांकडून प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे ३० हजार ४०० रुपये दंड वसूल केला.
दरम्यान, संचारबंदी व जमावबंदी या शासकीय आदेशाचे उल्लंघन करून रहिमतपुरातील अनेक गल्लीमध्ये ठिकठिकाणी युवकांची टोळकी सायंकाळी ठराविक वेळेत बसून गप्पांचा फड रंगवत होती. या टोळक्यांमुळे कोरोना संसर्ग वाढीला वेग येण्याची भीती निर्माण झाली होती. पाेलिसांच्या सायरनचा आवाज येताच टोळकी पसार होत होती. या टोळक्याला अद्दल घडविण्यासाठी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वेषांतर करून गटागटाने बसणाऱ्या टोळकीवर हल्लाबोल केला. साध्या वेशात दांडकी घेऊन युवकांच्या टोळक्याच्या दिशेने पोलीस चालून येत असल्याचे पाहून अनेकांनी धूम ठोकली. मात्र जे तावडीत सापडले त्यांना पोलिसांच्या लाठीचा चांगलाच प्रसाद मिळाला. दोन दिवस पोलिसांचा मार पडत असल्यामुळे अनेक गल्लीतील टोळकी बसणारी ठिकाणे रिकामी पडू लागली आहेत.
(चौकट)
घराबाहेर पडल्यास कारवाई होणारच
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी शासकीय आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन संदर्भात व्यापारी संघटनेला केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परंतु काही लोकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी नाइलाजास्तव दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. लोकांनी शासकीय आदेशाचे पालन करावे. विनाकारण विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी दिला आहे.
२३रहिमतपूर
फोटो : रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे पोलिसांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कारवाईचा दणका लावल्यामुळे रस्ते सुनसान झाले आहेत. (छाया : जयदीप जाधव)