रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेला स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण मोहीम २०२१’मध्ये केलेल्या दर्जेदार कामाबद्दल केंद्र शासनाकडून थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. या पुरस्काराने रहिमतपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रहिमतपूर येथील स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत सफाई आणि कचरामुक्त शहर तपासणी अहवाल निरीक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. शासनाच्या नियमावलीप्रमाणे कामकाज झाल्याने रहिमतपूर नगर परिषदेला भारत सरकारचे ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’चे थ्री स्टार मानांकन जाहीर झाले आहे. या पुरस्काराचे वितरण २० नोव्हेंबर २०२१ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण अमृत महोत्सव कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी आदी पदाधिकाऱ्यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
पश्चिम भारतामध्ये एक लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात रहिमतपूर नगर परिषदेने अनुक्रमे दहावा व सातवा क्रमांक यापूर्वीच पटकावला आहे. तसेच पालिकेने सन २०१९-२०मध्ये हागणदारीमुक्त शहर, ओडीएफ प्लस दर्जा आणि कचरामुक्त शहर जीएफसी थ्री स्टार मानांकन प्राप्त केलेले आहे. याबरोबरच आजअखेर अनेक पुरस्कार रहिमतपूर नगर परिषदेला मिळालेले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मिळण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपाध्यक्ष नीता माने, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
रहिमतपूरकरांचे सहकार्य कौतुकास्पद
रहिमतपूर शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी सातत्याने शहरवासीयांची धडपड सुरू असते. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नगरपालिका पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरवासीयांच्या खांद्याला खांदा लावून ताकदीने काम केले आहे. शासनाने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत रहिमतपूर पालिकेला थ्री स्टार मानांकन देऊन सर्वांच्या कामाचे चीज केले आहे. आगामी काळात पालिकेच्या नावलौकिकात भर पडेल व शहराचे नाव देशपातळीवर चमकेल, अशा पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन कामकाज केले जाईल, असा शब्द नगराध्यक्ष आनंदा कोरे व सुनील माने यांनी दिला.