रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर - वाठार रस्त्यावर सुर्ली मळा येथे चढ चढताना उसाने भरलेली एक ट्रॉली पाठीमागे जाऊन रस्त्यावर आडवी उलटली.तर दुसरी झाडाच्या फांदीला अडकल्याने पडता पडता वाचली.त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती व ट्रॅक्टर चालक नामदेव तळपकर यांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी पहाटे कालगाव येथून ट्रॅक्टर नंबर एम एच २३ टी ७५३७ हा दोन चारचाकी ट्रॉलीमध्ये ऊस भरून गाळपासाठी वर्धन अग्रो कारखान्याकडे निघाला होता.
दहा वाजण्याच्या सुमारास रहिमतपूर - वाठार रस्त्यावरील सुर्ली मळा येथील चढाला ट्रॅक्टरला उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉल्या ओढण्यात अपयश आले. ट्रॉल्या पाठीमागे घसरू लागल्याने ट्रॅक्टरचालक नामदेव तळपकर यांनी खाली उतरून ट्रॉलीच्या चाकाला दगड लावून पाठीमागे जाणार्या ट्रॉलीला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र रात्री झालेल्या पावसाने रस्ता ओला असल्याने ट्रॉलीची चाके पाठिंमागे घसरत होती. काही क्षणातच पाठीमागची ट्रॉली रस्त्याकडेच्या झाडाच्या फांदीला टेकली तोपर्यंत पहिली ट्रॉली रस्त्यावर कोसळली. त्या बरोबरच रस्त्यावर उसाचा ढिगारा पसरला.
या अपघातात दैव बलवत्तर म्हणूनच ट्रॅक्टर चालक नामदेव तळपकर यांचा जीव वाचला. या दोन्ही ट्रॉल्या व ट्रॅक्टर रस्त्यावरच आडवा असल्याने दोन्हीकडची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊसासह पडलेली ट्रॉली ओढण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र यामध्ये यश मिळत नव्हते. परंतु सातत्याने रस्ता रिकामा करण्यासाठी ट्रॅक्टरचालकाच्याकडून प्रयत्न सुरू होते.