सातारा जिल्ह्याला दीर्घ ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेतील गावे त्यावेळच्या नावावरून आजही ओळखली जातात. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर हे असेच एक गाव. या गावाच्या नावामागील कहाणी मोठी रंजक आहे.
प्रतापगडाच्या रणसंग्रामात अफझलखानासोबत त्याचा वकील कृष्णाजी भास्कर, सय्यद बंडा यांबरोबरच आणखी एक अधिकारी होता रहिमतखान. रहिमतखानाला अफझलखानाच्या मदतीसाठी विजापूरहून वाईला सैन्यासह पाठवले गेले होते. वाटेत रहिमतखानाने कमंडलू नदीकाठावर काळीशार जमीन पाहून छावणी टाकली. याच छावणीचे पुढे छोट्या गावात रूपांतर झाले. आजही हे गाव रहिमतखानाच्या नावाने ‘रहिमतपूर’ म्हणून ओळखले जाते, अशी माहिती मिळते.
रहिमतपूर नावाच्या जनकत्वाबाबत दुसरा मतप्रवाह सांगितला जातो. तो म्हणजे ज्यावेळी साधुनी रणदुल्लाखानास दीक्षा दिली त्यावेळी त्याला अत्यानंद झाला आणि रणदुल्ला खान परमेश्वरास उद्देशून म्हणाला, ‘माझ्यावर फार मोठी दया म्हणजे राहमत केली आहे.’ रणदुल्ला खानाने या ठिकाणाला रहिमतपूर म्हणजेच रहिमतपूर नाव दिल्याचा संदर्भ आर. पी. माने यांच्या ‘रहिमतपूर नगरी’ या लेखात आढळतो.
रहिमतपूर बरीच वर्षे विजापूर सरकारच्या अधिपत्याखाली होते. शिवाजी महाराजांना पक़डण्यासाठी (सप्टेंबर १६५९) अफझलखान रहिमतपूरमार्गे वाईला जाताना त्याचा मुक्काम येथे होता. सन १६६२ मध्ये शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी शायिस्तेखानाने येथे फौजेची एक तुकडी ठेवली होती. दिनांक १० जानेवारी १६९९ रोजी धनाजी जाधव, हैबतराव निंबाळकर व राणोजी घोरपडे यांची व औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान यांची
रहिमतपूरजवळ मोठी लढाई होऊन त्यात झुल्फिकारखानाचा पराभव झाला होता. सन १७११ मध्ये हैबतराव निंबाळकराने सेनापती चंद्रसेन जाधवाचा देऊर येथे पराभव केला. त्यावेळी तो पळून रहिमतपूरला आला होता. सन १७७७ मध्ये महादजी शिंदे कोल्हापूरवर स्वारी करण्यासाठी जाताना त्याचा बरेच दिवस येथे मुक्काम होता, असे दाखले इतिहासात पाहायला मिळतात.
दुसऱ्या बाजीरावाचा पाठलाग करीत इंग्रज सेनापती जनरल स्मिथ ६ फेब्रुवारी, १८१८ रोजी येथे आला होता. शाहू महाराजांची रखेली वीरूबाई रहिमतपूरमधील कासुर्डे घराण्यातील होती. पेशव्यांच्या कारकिर्दीत त्यांची एक टांकसाळ रहिमतपूरला होती. येथे मोहरा, रुपये, चांदीची नाणी व पैसे पाडीत. रहिमतपूर गावाचे असेही काही ऐतिहासिक संदर्भ सापडतात.