साताराः पुढील निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तर मी पंतप्रधान व्हायला तयार आहे, या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी याबाबत अत्यंत सावध आणि सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल गांधींनी पंतप्रधान होण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला काय वाटतं?, या प्रश्नावर पवार म्हणाले, 'मराठीत एक म्हण आहे. बाजारात तुरी आणि कोणीतरी कोणाला मारी. तुम्हाला माहीत असेल. त्यामुळे आधी येऊ द्या तूर. कसं पीक लागलंय बघू आणि मग ठरवू. परंतु, आजचा ट्रेंड बदलाला अनुकूल आहे, हेही तेवढंच खरं.'
भाजपाला विरोध करणारे जे पक्ष आहेत त्यात काँग्रेस हा सर्व राज्यांमध्ये जम बसवलेला पक्ष आहे. ममतांची ताकद बंगालमध्ये आहे, मायावती-अखिलेश उत्तर प्रदेशात आहेत, चंद्राबाबू नायडूंचा जोर आंध्र प्रदेशात आहे तर चंद्रशेखर रावांचं वर्चस्व तेलंगणमध्ये आहे. पण काँग्रेसचं अस्तित्व सगळ्या राज्यांमध्ये पाहायला मिळतं, असं सूचक विधानही शरद पवार यांनी केलं. अर्थात, आम्ही आम्ही किती जागा मिळवतो, सरकार मिळवण्यापर्यंत पोहोचतो की नाही हेही पाहावं लागेल, असा सावध पवित्राही त्यांनी घेतला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी झक्कास बॅटिंग केली. मी असल्यावर सगळं ठीक होतं, अशी (वर) असते ती कॉलर अशी (खाली) होते', असा टोमणा त्यांनी उदयनराजेंना मारला. या पत्रकार परिषदेनंतर काही काळ हॉलचा दरवाजाच उघडत नव्हता. त्यामुळे भल्याभल्यांची राजकीय कोंडी करणारे शरद पवार काही मिनिटं खोलीतच अडकले होते.