सातारा : पारधी, कातकरी, गोपाळ, मराठा, बौद्ध, वडार व इतर समाजाच्या वंचित समूहाला जागेसह घरकुल देण्यात यावे, या मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव दाखल करून देखील कार्यवाही होत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात बुधवार, दि. १५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राहुटी आंदोलन करण्याचा इशारा लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला आहे.
चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या समाजाला लवकर घरे मिळवून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असताना येथील प्रशासन मात्र कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे पुढे येत आहे. पारधी समाज आपले जीवन उघड्यावर जगत आहे. मुलांना शाळा नाहीत, गावात स्मशानभूमी नाही, वीज नाही, अशा परिस्थितीत जीवन जगताना शासन निव्वळ अनेक घोषणा करताना दिसते.
या आंदोलनामध्ये नम्या भोसले, यंत्र्या भोसले, डिया भोसले, पितांबर भोसले, विजय शिंदे, रोहित शिंदे, खुदा भोसले, अमर भोसले, रोणिका भोसले, मुक्या भोसले, राजा भोसले, अबदेश भोसले, माकेश भोसले, अक्काताई भोसले, तोगरी भोसले हे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.