सातारा : शहरालगत असणाऱ्या देगाव फाटा परिसरातील भंडारी हाईट्स इमारतीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून ४७ हजारांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी राजू बडेकर, मयूर कदम, शुभम घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, याप्रकरणी राजू तात्याबा बडेकर (रा. मोरे कॉलनी, सातारा. मूळ रा. चांदक, ता.वाई), मयूर प्रमोद कदम (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), शुभम संजय घाडगे (रा. बाजारपेठ, कोरेगाव) हे संशयित देगाव फाटा परिसरातील भंडारी हाईट्स इमारतीच्या आडोशाला जुगारअड्डा चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांना मिळाल्यानंतर येथे कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार येथे छापा टाकला असता संशयित जुगार अड्डा चालवत असल्याने निदर्शनास आले. या वेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत त्यांच्याकडील (एमएच ११ - बीपी ५८८३) ही दुचाकी, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.