सातारा : फलटण तालुक्यातील कुरवली (खुर्द) येथील बाणगंगा नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आठजणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १४ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.अनिल बबन पवार (वय ४३), सुखदेव हिरालाल जाधव (वय ४२, रा. दोघे रा. जिंती नाका, फलटण), आदेश जालिंदर जाधव (वय २२, रा. वाठार निंबाळकर,ता. फलटण), विनोद रामभाऊ मदने (वय २९, रा. धुळदेव, ता. फलटण), वैभव संजय निंबाळकर (वय २१,रा विंचुर्णी ता फलटण), मालोजी उर्फ पप्पू बाळू जाधव (वय २९,रा जाधववाडी ता फलटण), नवनाथ ज्ञानेश्वर भंडलकर (वय २१, रा. तावडी, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तानाजी बबन जाधव (दोघे. रा. धुळदेव, ता फलटण) हा फरार झाला. या संशयितांच्या ताब्यातून सहा ट्रॅक्टर, एक टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. वरील संशयितांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द गावातून जात असलेल्या बाणगंगा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
साबळे यांनी रविवारी मध्यरात्री बाणगंगा नदी पात्रात छापा टाकला असता वरील संशयित नदीपात्रातून ट्रॅक्टर व टेम्पोतून वाळूची वाहतूक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाळू वाहतूक करण्याबाबतचा परवाना आहे का, अशी विचारणा पोलिसांनी त्यांच्याकडे केली. तेव्हा त्यांनी परवाना नसल्याचे सांगताच त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या ताब्यातील वाळूने भरलेले सहा ट्रॅक्टर एक टेम्पो असा १४ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार विलास नागे, संतोष जाधव, गणेश कापरे, वैभव सावंत, विजय सावंत यांनी ही कारवाई केली.