सातारा : येथील औद्योगिक वसाहतीतील एका गोदामात कृषी विभागाने छापा टाकून सोयाबीनचे बोगस बियाणे तयार करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये १ हजार २२ क्विंटल बियाणे तसेच एकूण २ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविराज कदम यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर बुधराव राकेश दवंडे (रा. गंज बेतुल, मध्यप्रदेश) आणि कंपनी प्रतिनिधी अमित दिवाण यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.दि. ५ मे रोजी कृषी विभागाच्या पथकाने औद्योगिक वसाहतीतील अनुप ओमप्रकाश डाळ्या (रा. उत्तेकर नगर, सातारा) यांच्या खासगी गोदामाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना सोयाबीन बियाणे चाळणी लावून २५ किलोंच्या पिशव्यांचे बॅगिंग आणि टॅगिंग करताना निदर्शनास आले. त्या बॅगेवर उत्पादक व विपननकरिता सुंदरम एंटरप्रायजेस प्रा. लि. मँक्यानिक चौक माता मंदिरजवळ, गंज बैतुल मध्यप्रदेश असा मजकूर छापलेला होता.तसेच तेथे २५ किलोच्या १९१६ बॅगांमध्ये ४७९ क्विंटल बियाणे आणि गोणपटाच्या ५० किलोच्या वजनाच्या १०८६ बॅगा आढळून आल्या. यामध्ये ५४३ क्विंटल सोयाबीन होते. अशाप्रकारे एकूण १ हजार २२ क्विंटल सोयाबीनचे बोगस बियाणे आढळून आले. या सोयाबीनची किंमत अंदाजे २ कोटी ४ लाख ४० हजार रुपये आहे. त्याचबरोबर मजकूर छापलेल्या ५२० रिकाम्या बॅगा, ४७० लेबल्स, बॅगच्या २ शिलाई मशिन, एक वजन काटा आणि बियाणे प्रोसेसिंग मशिनही दिसून आले.सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे तपास करीत आहेत.
कृषी विभागाचे पथक तयार...
सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन क्षेत्रात वाढ होत चालली आहे. याचाच फायदा घेत बोगस बियाणे विक्रीचा प्रयत्न होतो. यासाठी कृषी विभागाची पथके लक्ष ठेवून कारवाई करतात. मागीलवर्षीही कृषी विभागाच्या पथकाने बनावट खत आणि बियाण्यांप्रकरणी कारवाई केली होती.