कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील असंख्य गावांना रेल्वे गेटमुळे दळणवळणाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार शशिकांत शिंंदे यांनी आता ‘मिशन रेल्वे गेट’ हाती घेतले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून चिंचणेर संमत निंंब आणि मंगळापूर-तांदुळवाडी येथील गेटचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आता उर्वरित गेटचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे.मध्य रेल्वेचा पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे सातारा तालुक्यात भुर्इंज ते जळगाव रस्त्यावर शिवथर येथे, जिहे-कठापूर ते खेड-नांदगिरी मार्गावर गोगावलेवाडी (पुनर्वसित) येथे तसेच वडूथ-सांगवी रस्त्यावर जरंडेश्वर स्टेशननजिक, सातारा -तांदुळवाडी-कोरेगाव रस्त्यावर कोल्हेश्वर विद्यालयानजीक गेट आहे. तेथील दळणवळणाच्या प्रश्नांची गंभीर स्वरुप धारण केले आहे. या ठिकाणी असलेली गेट सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळेतच खुली राहत असल्याने लोकांना विशेषत शेतकरी आणि नोकरदारांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना तर मोठा त्रास होता. तांदुळवाडी, मंगळापूर, चिंचणेर संमत निंंब या गावांना कोरेगावातून जाण्यासाठी रेल्वे गेटचा अडसर होता. याबाबतीत मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांकडे आमदार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता २४ तास रेल्वे गेट खुले करण्याची मागणी मान्य झाली आहे. ही मागणी मान्य झाल्याने सुमारे तिन्ही गावांचा फायदा होणार आहे. सातारा तालुक्यातील चिंंचणेर संमत निंब येथील भुयारी मार्ग पूर्ण करण्यात आल्याने तेथील रेल्वे मार्गाचा आता ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. जिहे-कठापूर ते खेड-नांदगिरी मार्गावर गोगावलेवाडी (पुनर्वसित) येथील रेल्वे गेट मुळे गोडसेवाडी आणि कठापूर येथील ग्रामस्थांना गोडसेवाडी मार्गे जावे लागत आहे. तेथून अवजड वाहने जात नसल्याने त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. हाच रस्ता पुढे सातारा तालुक्यातील जिहेसह अंगापूर गावांकडे जात असल्याने सतत वर्दळ असते. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनशी बोलणे झाले असून, तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर ते गेट देखील २४ तास खुले राहील, असा विश्वास आ. शिंंदे यांनी व्यक्त केला. वडूथ-सांगवी रस्त्यावर जरंडेश्वर स्टेशननजीक आणि भुर्इंज ते जळगाव रस्त्यावर शिवथर येथील रेल्वे गेटची अडचण ही विशेषत ऊस वाहतुकीसाठी होत आहे. शेतकऱ्यांसह वाहन मालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही बाब रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी या विषयामध्ये सकारात्मकता दाखविलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न निकाली निघेल, असेही आ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)देऊरजवळ रेल्वे गेटमुळे वाहतूक कोंडी होत होती. दिवसातून काही तास हे गेट बंद राहत असल्याने गेटच्या दोन्ही बाजूंना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. याबाबतीत खासदार शरद पवार, खासदार विजयसिंंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर तेथे उड्डाण पूल मंजूर झाला आहे,’ अशी माहिती आममदार शिंंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोरेगाव तालुक्यातील रेल्वे गेट राहणार खुले
By admin | Published: June 23, 2015 11:59 PM