फलटण : ब्रिटिशकाळापासूनच प्रलंबित फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या निधीचा प्रश्न, तसेच कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प, निरा देवघर प्रकल्प व जिहे-कठापूर प्रकल्प हे पाणी प्रकल्प त्वरित मार्गी लावून दुष्काळी जनतेला दिलासा द्यावा,’ अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. याबाबत पंतप्रधानांनी सकारात्मकता दर्शविली आहे.
नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व पत्नी ॲड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा केली.
‘कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा पश्चिम महाराष्ट्रातील २२ दुष्काळी जिल्ह्याला लाभ देणारा असून, कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कर्नाटक राज्यात न जाता ते आडविले आणि वळविले तर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडण्यास मदत होणार आहे. दरवर्षी येणारी पूरग्रस्त परिस्थिती यामुळे निर्माण होणार नसल्याने ११० टीएमसी महाराष्ट्राला पाणी मिळणारी योजना कायमस्वरूपी मार्गी लावावी आणि यासाठी मुबलक निधी उपलब्ध करावा,’ अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली.
ब्रिटिश काळापासून फलटण-पंढरपूर हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प रखडला आहे. तेथे जाण्यासाठी फलटण ते पंढरपूर हा उपयुक्त रेल्वे मार्ग होणार आहे. केंद्र, राज्य मिळून प्रत्येकी पन्नास टक्के निधी या रेल्वेमार्गासाठी देणार होते; मात्र सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार निधी देण्यास टाळाटाळ करीत आहे. फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी निधी देऊन रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी खासदार रणजितसिंह यांनी केली.
नीरा देवघर, तसेच जिहे-कठापूर ही योजना महत्त्वाची असल्याने या योजनेच्या पूर्ततेसाठी लक्ष द्यावे. नीरा-देवघर योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची गरज आहे. या योजनेचे पाणी बारामतीकडे पळविले जात आहे. त्यामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोला या दुष्काळी तालुक्यांना पाणी कमी पडत आहे. कै. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कटापूर योजना) मुळे माण, खटाव तालुक्यांतील ६७ दुष्काळी गावांना पाणी मिळणार आहे. ही योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून शंभर टक्के निधी प्राप्त व्हावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह यांनी केली.
चौकट-
विकासकामांद्वारे ओझे हलके करण्याची ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शूूरवीरांची प्रतिमा दिली. दरम्यान, ‘मतदारसंघातील कामांची दिलेली यादी खूप मोठी हे तेच माझ्यावर मोठे ओझे आहे. हे ओझे मी निश्चितच विकासकामांद्वारे हलके करील. तसेच मतदारांचा विश्वास कायम राहील,’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
फोटो
११नरेंद्र मोदी
नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी शूरवीरांच्या प्रतिमा भेट दिल्या.