सातारा : सातारा शहरात पाच दिवसानंतर पावसाला पुन्हा सुरूवात झाली आहे. यामुळे सातारकरांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. तर पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी २४ तासांत नवजाला २० आणि महाबळेश्वर येथे २२ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. कोयना धरणातही पाण्याची आवक कमी झाली आहे. तरीही धरणात २२ दिवसांत १८ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाला. पूर्व तसेच पश्चिम भागातही हजेरी लावली. पण, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी-अधिक राहिले आहे. त्यातच काही दिवस उघडीपही होती. त्यामुळे यंदा जोरदार पावसाला सुरूवात कधी होणार अशी चिंता लागलेली आहे. कारण, जुलै महिना मध्यावर आलातरी प्रमुख आणि मोठ्या धरणांत अल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे ही धरणे कधी भरण्याविषयीही चिंता लागून राहिलेली आहे. तर सातारा शहरात पाच दिवस ढगाळ वातावरण होते. कधीतरी रिमझिम पाऊस व्हायचा. तसेच सूर्यदर्शनही घडत हाेते.पण, गुरूवारी रात्रीपासून पाऊस पडू लागला आहे. शुक्रवारी सकाळी रिमझिम पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर आकराच्या सुमारास जोरदार पाऊस पडू लागला. तर पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात दररोज पावसाची हजेरी आहे. पण, या पावसात सातत्य नाही. बुधवारी दमदार पाऊस झाला. पण, गुरूवारी पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण अनिश्चित स्वरुपाचे राहिले आहे.
जिल्ह्यात सरासरी १.८ मिलीमीटर पर्जन्यमान..जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. २४ तासांत सरासरी १.८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. सातारा तालुक्यात १.८ मिलीमीटर पाऊस झाला असून जावळीत ३.४, पाटण तालुक्यात १.३, कऱ्हाड १.१, कोरेगाव तालुक्यात ०.५ मिलीमीटर पाऊस झाला. तसेच फलटण तालुक्यात १.३, खंडाळा ०.४, वाई २.२ आणि महाबळेश्वर तालुक्यात १५.७ मिलीमीटर पाऊस पडला. तर माण आणि खटाव तालुक्यात पाऊस झालेला नाही.
कोयना धरणात ३३.६० पाणीसाठा..
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत १ हजार ६०६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत १ हजार ७८३ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार ३९६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक कमी झाली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ६ हजार ६२० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठा ३३.६० टीएमसी झाला होता. २१ जून ते १२ जुलै यादरम्यान कोयना धरणात सुमारे १८ टीएमसीने साठा वाढलेला आहे.