सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असून सोमवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणात आवक वाढली आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणसाठा ८३.७३ टीएमसी झाला होता. तर धरणातील विसर्ग अजून बंदच आहे.पश्चिम भागात मागील आठवडाभर पावसाची उघडझाप सुरू होती. तसेच काही भागात पावसाची दडी होती. मात्र, शनिवारपासून चांगल्या पावसाला सुरूवात झाली. रविवारीही कोयनानगरसह नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणेाली भागात चांगलाच बरसला. त्यामुळे पावसाचा रुसवा गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पावसामुळे पुन्हा ओढे, ओहोळ भरुन वाहू लागले आहेत. तसेच भात खाचरातही पाणी साचल्याने भात पिकाला फायदा होणार आहे. तर पश्चिम भागातीलच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातही हळूहळू पाणी आवक वाढत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला ४५ आणि महाबळेश्वर येथे ५३ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ४६११ मिलीमीटर पडलेला आहे. तर महाबळेश्वरमध्ये ४२८१ आणि कोयानानगरला आतापर्यंत ३२३१ मिलीमीटर पाऊस झाला. कोयनाक्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणात आवक वाढली आहे.
सकाळच्या सुमारास धरणात ४३११ क्यूसेक वेगाने पाणी येत हेाते. तर धरण पाणीसाठा ८३.७३ टीएमसी झालेला. धरण भरण्यासाठी अजुनही जवळपास २१ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच १८ आॅगस्टनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याने धरण भरण्यास सप्टेंबरपर्यंतची प्रतीक्षा करावी लागेल असा अंदाज आहे.