सांगली : आज, शनिवारी सकाळी आठपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने तासगाव, मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा तालुक्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका फुलोऱ्यातील बागांना बसणार आहे. उर्वरित बागांवरही भुरी, करपा, दावण्या या रोगांचे आक्रमण होणार असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला. रात्री किरकोळ पाऊसही झाला; परंतु आज सकाळपासून मात्र पावसाची रिपरिप सुरू आहे. हे वातावरण सध्या फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागांसाठी अत्यंत धोकादायक आहे. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तिन्ही महिन्यांत छाटणी घेणारे उत्पादक जिल्ह्यात आहेत. जवळजवळ सर्व क्षेत्रांतील छाटण्या उरकल्या आहेत. आगाप छाटण्या घेतलेल्या क्षेत्रात द्राक्षाचे घडही दिसू लागले आहेत. मात्र सप्टेंबर छाटणीच्या बागांना आज सुरू झालेल्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण याच बागा फुलोऱ्यात आहेत. या बागांच्या द्राक्षमण्यांत पाणी साचून राहिल्यास घडांमध्ये कुज सुरू होण्याची शक्यता आहे. पाऊस दोन दिवस राहिल्यास द्राक्षघड कुजून पूर्ण खराब होऊ शकतात. त्यामुळे सर्व उत्पादकांचे लक्ष हवामानाच्या अंदाजाकडे आहे. संकेतस्थळावरून दाखवण्यात आलेला पाऊस, आर्द्रता याचा अभ्यास करून छाटणीचा काळ, बागेची स्थिती याचा अभ्यास करून उपाययोजनांचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.काही उत्पादकांनी पावसाच्या रिपरिपीतच औषध फवारणी सुरू केली. मात्र, अशा फवारणीचे औषध पावसाच्या पाण्यात वाहून जाऊन त्या औषधाची मात्रा लागू होत नाही. त्यामुळे बहुतांश उत्पादक पाऊस थांबण्याची वाट पहात आहेत. पाऊस थांबल्यानंतर द्राक्षबागेची पाहणी करून औषधाची निवड, मात्रा निश्चित करून सर्वच द्राक्षबागायतदारांना औषध फवारणी करावी लागणार आहे.
पावसाने द्राक्षबागा संकटात
By admin | Published: October 26, 2014 12:07 AM