कोपर्डे हवेली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस कऱ्हाड तालुक्याच्या उत्तर भागातील पूर्व विभागातील खरीप पेरणीपूर्व मशागतीला पूरक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
कऱ्हाड उत्तरमधील पूर्वेकडील विभाग जिरायती म्हणून ओळखला जातो. बागायती क्षेत्राच्या तुलनेत जिरायती क्षेत्र जास्त आहे. या विभागातील शेतकरी शेतात खरीप आणि रब्बी हंगामांत अशी दोन पिके घेतात. खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीला पावसाची गरज असते. त्यासाठी पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत असतात.
पाऊस पडल्यानंतर फणणी, वेचणी, सरी सोडणे, आदींसह मशागतीची इतर कामे केली जातात. वेळेत मशागती पूर्ण करून वेळेत पेरणी झाली. उत्पादनात वाढ होते; शिवाय दोन्ही हंगामांतील पेरणी आणि काढणी वेळेत होत असते. खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन घेऊन रब्बी हंगामात शाळू पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पडलेला पाऊस पेरणीपूर्व मशागतीला पूरक असल्याने जमिनीला घात आल्यांतर पेरणीपूर्व मशागतीला या विभागात सुरुवात होऊन शेतकरी मशागती करून मान्सूनची पेरणीसाठी वाट पाहत बसेल.
चौकट....
सोयाबीन पिकाची पेरणी लवकर झाल्यास त्याची काढणी लवकर होऊन शाळू पिकाची पेरणी होऊ शकते. असे झाल्यास शाळू पिकाला पाण्याची टंचाई जाणवणार नाही. पेरणी उशिरा झाल्यास जिरायती विभागातील शेतकऱ्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.