सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वर येथे १५८ मिलीमीटरची नोंद झाली. तर नवजाच्या पावसानेही आतापर्यंत तीन हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. त्यातच सततच्या पावसामुळे कोयना धरणसाठ्यातही वेगाने वाढ होत असून ५७ टीएमसी साठा झाला होता. तर पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच आहे.पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोलीसह कांदाटी खोऱ्यात आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडीसह काेयना धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. मंगळवारी सकाळच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस हा नवजा येथे १८७ मिलीमीटर पडला. त्यानंतर महाबळेश्वरला १५८ आणि कोयनेला १२६ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा नवजा येथेच ३०५९ मिलीमीटर पडला. तर महाबळेश्वरला आतापर्यंत २९४० मिलीमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयनानगर येथे २१९१ मिलीमीटरची नोंद झालेली आहे.मागील आठ दिवसांपासून पश्चिमेकडील प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ५७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात ५३ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तसेच सोमवारपासून धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मंगळवारीही हा विसर्ग सुरू होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
Satara: नवजाचा पाऊस तीन हजारी; कोयना ६० टीएमसीच्या उंबरठ्यावर, विसर्ग सुरूच
By नितीन काळेल | Published: July 25, 2023 1:03 PM