कऱ्हाड : सुपने, ता. कऱ्हाड परिसरात बुधवारी रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे रात्रभर वीजपुरवठा विस्कळीत होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खंडित झालेली वीज दहा वाजण्याच्या सुमारास आली. मात्र, त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना घडल्या. रात्रभर वीज चालू-बंदचा खेळ सुरू होता. काही वेळा कमी दाबाने तर काही वेळा उच्च दाबाने पुरवठा झाल्यामुळे विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले. अखेर गुरुवारी सकाळी पुरवठा सुरळीत झाला.
कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
कऱ्हाड : कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बुधवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहिले. हे पाणी नदीत मिसळल्यामुळे रात्रीतच नदीची पाणी पातळी वाढल्याचे दिसून आले. पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर कचराही पात्रातून वाहत आला आहे. ठिकठिकाणी हा कचरा अडकून राहिल्याचे गुरुवारी सकाळी दिसून येत होते. तसेच नदीपात्रातील पाणी गढूळ झाले असून पात्रानजीक असणाऱ्या शेतातही पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होणार आहे.
ढेबेवाडीत बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त तैनात
ढेबेवाडी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना प्रशासनाने अनलॉकची प्रक्रियाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ढेबेवाडी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवत गावोगावी गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. विभागात अनेक गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती. त्यातच होम आयसोलेशनमुळे संसर्ग वाढत होता. बाधितांच्या घरातील सदस्य बाजारपेठेमध्ये खुलेआम वावरत असल्याने कोरोनाची साखळी खंडित करणे मोठे आव्हान बनले होते. सध्या ढेबेवाडीतील रहदारी कमी झाली असून पोलिसांनीही कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
आजार रोखण्यासाठी फवारणीची मागणी
कऱ्हाड : शहरातील वाढीव हद्दवाढ भागातील अनेक गटारांची सफाई पालिकेने केलेली नाही. ती साफसफाई तातडीने करावी, अशी मागणी होत आहे. शहरात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधक फवारणीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने कार्वे नाक्यापासून पूर्व व पश्चिम भागातील सर्व भागांमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे. फवारणीचे वेळापत्रक आखून पालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.