कऱ्हाड : शहरासह तालुक्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. गत आठवड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतात अद्यापही पाणी साचून आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यास पिके कुजण्याची भीती असून, शेतातून पाणी काढण्यासाठी काही शेतकरी चर खोदत आहेत.
रेलिंगवर वेली
कऱ्हाड : कऱ्हाड-पाटण मार्गावर वारूंजी फाट्यापासून विजयनगरपर्यंत दुभाजक उभारले असून, या दुभाजकात संरक्षक रेलिंग तयार करण्यात आले आहे. मात्र, गत आठवड्यात पडलेल्या पावसामुळे दुभाजकात मोठ्या प्रमाणावर वेली वाढल्या असून, या वेलींनी रेलिंगला विळखा घातला आहे. परिणामी रस्त्याचे सौंदर्य नाहीसे झाले आहे. संबंधित विभागाने स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर धोका
कऱ्हाड : विजयनगर ते मुंढे गावापर्यंत कऱ्हाड-पाटण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाळू व खडे साचले आहेत. या रस्त्याला उतार असून, गत आठवड्यात पडलेले पावसाची पाणी या रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे पाण्याबरोबर वाहत आलेली वाळू, खडी रस्त्यावर पसरली आहे. त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे.
रहदारीस अडथळा
कऱ्हाड : शहरातील सह्याद्री हॉस्पिटलसमोर जुन्या पुलानजीकच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून, वाहतूक कोंडी होत आहे. या पुलावरून दुचाकी वाहतुकीस परवानगी आहे. मात्र, रुग्णालयात येणारे अनेकजण आपली चारचाकी वाहने रस्त्यातच पार्क करीत असल्याने अडथळा होत आहे.