कऱ्हाड : तालुक्यात गत चार दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. गत पंधरा दिवस तालुक्यात वळीव तसेच माॅन्सूनपूर्व पाऊस झाला. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचून राहिले होते. परिणामी, मशागतीची कामे खोळंबली होती. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतातील पाणीही कमी झाले असून, शेतकऱ्यांनी पेरणी तसेच मशागतीच्या कामाला जोमाने सुरुवात केली आहे.
बाजारपेठेत गर्दी
कऱ्हाड : जिल्हा प्रशासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. गत आठवड्यापासून अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. इतर सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, तरीही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. अनेकजण कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे संक्रमण पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
अपघात वाढले
कऱ्हाड : कऱ्हाड-पाटण मार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून अपघातही वाढल्याचे दिसून येत आहे. गत काही महिन्यांत या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये काही जणांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणानंतर वाहतूक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण झाल्यामुळे वाहतुकीचा वेग वाढला असून चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात होत आहेत.
महामार्गावर स्वच्छता
कऱ्हाड : गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर वारूंजी फाटा ते विजयनगर हद्दीत दुभाजक उभारण्यात आले आहेत. तसेच सध्या या दुभाजकातील कचरा गोळा केला जात असून, महामार्गाचीही स्वच्छता केली जात आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यात पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.