सातारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तुरळक स्वरुपात पाऊस होत असून महाबळेश्वरला अवघ्या १० मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरण परिसरात पावसाची उघडीप आहे. दरम्यान, पूर्व भागात काही ठिकाणी सोमवारी पाऊस झाला. तर साताऱ्यात ढगाळ वातावरण कायम आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. विशेष करून पश्चिम भागात अशाप्रकारे पाऊस होत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा आणि बामणोली या भागातही तुरळक पाऊस होत आहे. तर सातारा शहर व परिसरात सहा दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली नाही. सोमवारी पूर्व भागात काही ठिकाणी पाऊस झाला. पण, पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला काहीही पाऊस झाला नाही. मात्र, जूनपासून आतापर्यंत ९१३ मिलीमीटर पाऊस झाला. तर नवजाला सकाळपर्यंत ६ तर यावर्षी आतापर्यंत १०५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला १० तर जूनपासून १२१३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरणात ४२.५२ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. धरणात ४७१० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम आहे. हे पाणी नंतर कोयना नदीपात्रात जाते.
...................................................................