सातारा : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही झाला असून रविवारपासून सर्व ११ तालुक्यात कमी-अधिक फरकाने पावसाने हजेरी लावली. तर सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात रविवारी रात्रभर पाऊस होता. त्यातच पावसाबरोबरच जोरदार वारा असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याने नुकसान झाले. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत महाबळेश्वर मंडलात ८३ तर लामजला सर्वाधिक १२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वळवाचा पाऊस होत आहे. त्यातच तौक्ते वादळाचा प्रभाव दोन दिवसांपासून जिल्ह्यात दिसू लागला आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासून साताऱ्यासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तसेच वारे वाहत होते. तर सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हळू-हळू पाऊस पडत होता. पण, रात्री आठनंतर वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. विशेष करुन सातारा शहरासह पश्चिम भागात हा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला.
सातारा तालुका, पाटण, जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर राहिला. तर कोरेगाव, माण, खटाव, फलटण, कऱ्हाड या तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. रात्रभर हा पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडत होता. सातारा शहरात तर रविवारी रात्रभर रिमझिम पाऊस आणि वारा वाहत होता. या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून वीजतारांचे नुकसान झाले. तसेच घरावरही झाडांच्या फांद्या कोसळण्याचा प्रकार घडला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.दरम्यान, सोमवारीही पाऊस पडत होता. पूर्व भागात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. पण, पश्चिम भागात अधून-मधून पाऊस पडत होता. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. त्यातच वारेही वाहत असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत होता.