गोंदवले : आजच्या आधुनिक युगात हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी सहसा कोणी पंचांग पाहत बसत नाही. मात्र, ग्रामीण भागात आजही गावोगावी ‘पाडवा वाचन’ हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. यामध्ये पंचांग वाचून हवामानाचा अंदाज वर्तविला जातो. यंदाचा पाऊस हा माळ्याच्या घरी असल्यामुळे पर्जन्यमान चांगले असणार असल्याचे गावोगावच्या ‘पाडवा वाचन’मध्ये सांगण्यात आले. चैत्र पाडव्याला गावोगावी पाडवा वाचन होते. यंदाचा पाऊस माळी समाजाच्या घरी असल्याचे सांगण्यात आले. माळी समाज भाजीपाला, फुलांची शेती करत असल्यामुळे माळ्याच्या घरचा पाऊस जास्त पडतो, तर वाण्याच्या घरी पाऊस असेल तर तो मोजूनमापूनच पडतो, असा गावकऱ्यांचा समज असतो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा ग्रामीण भागात आजही पाहायला मिळते. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातही ही परंपरा काही गावांमध्ये टिकून आहे. गुढीपाडव्यापासून मराठी वर्षाची सुरुवात होते. या वर्षातील पहिला सण म्हणजे पाडवा आहे. पाडव्याला वाचन करण्यात येणाऱ्या पंचांग वाचनाला खूप महत्त्व असते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा काळाच्या पडद्याआड चालली असली तरी काही गावांमध्ये मात्र ती आजही जपली जात आहे. दरवर्षी ग्रामदैवताच्या मंदिरात एकत्र येऊन पाडवा वाचन केले जाते. पाडवा वाचनाअगोदर ग्रामदैवताच्या मंदिरावर गुढी उभारली जाते. त्यानंतर दुपारी १२ वाजता ग्रामस्थ मंदिरात एकत्र येतात. मानकऱ्याने पंचांगाचे पूजन केल्यानंतर शास्त्री, पुराणिक पंचांग वाचन करतात. वर्षभरात काय-काय घडणार आहे, हे पंचांग वाचून सांगितले जाते. यामध्ये पहिला पाऊस कोणाच्या घरी आहे, हे पाहिले जाते. पंचांगणात यंदाचा पाऊस हा माळ्याच्या घरी असल्याचे दिले आहे. त्यामुळे यंदा जास्त पाऊस पडणार सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही समाधानाची गोष्ट असल्यामुळे सर्वत्र आनंदीआनंद आहे. यावेळी गावचे पाटील, सरपंच, देवाचे पुजारी आणि बाराबलुतेदार उपस्थित असतात. पाडवा वाचनानंतर पुजारी सर्वांना लिंब-गुळाचे मिश्रण वाटतात. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होते. (वार्ताहर)
यंदाचा पाऊस माळ्याच्या घरी...
By admin | Published: March 25, 2015 10:45 PM