सातारा : जिल्ह्यात सलग पाच दिवस सुरू असलेला पावसाचा जोर बुधवारी ओसरला. सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे क्षेत्र असलेल्या कोयना परिसरात बुधवारी दिवसभर ४२, नवजा ४६, तर महाबळेश्वर येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पावसाने दडी दिल्याने पाटण तालुक्यात नदी व ओढ्यांना आलेला पूर ओसरल्याने जनजीवन पूर्ववत झाले. सातारा शहरात बुधवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. हलक्या सरी वगळता दमदार पाऊस झाला नाही. महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या महाबळेश्वरातही पावसाने विश्रांती घेतली. याठिकाणी केवळ २१ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरणात बुधवारी ४३.७० टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणात चोवीस तासांत ३.१७ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात प्रतिसेकंद ५२ हजार ७७३ क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील नदी, नाले, ओढ्यांना आलेला पूर बुधवारी ओसरल्याने जनजीवन पूर्ववत झाले. मोरगिरी, मल्हारपेठ, मणदुरे, ढेबेवाडी या ठिकाणीही पावसाचा जोर ओसरला. (प्रतिनिधी)
पावसासंगे पूरही ओसरला!
By admin | Published: July 13, 2016 11:45 PM