सातारा : चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन फुुटांनी वाढ झाली असून, पाणीसाठा ११ फुटांवर पोहोचला आहे. त्यामुळे सातारकरांना यंदाचा उन्हाळा सुसह्य जाणार असून, पाणीटंचाईच्या संकटातूनही सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला कासमधून दररोज साडेपाच लाख लीटर पाणी उपलब्ध केले जाते. पाण्याची दैनंदिन गरज पाहता २५ फूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या या तलावाची पाणीपातळी दररोज एक इंचाने कमी होत असते. शिवाय बाष्पीभवन व तलावातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळेदेखील जलसाठा कमी होत असतो. उन्हाळा सुरू झाल्यापासून पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
शनिवार व रविवारी सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे तलावाचा साठा आठ फुटांवरून आता अकरा फुटांवर पोहचला आहे. त्यामुळे पुढील महिनाभरातील चिंता आता मिटली असून, सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पालिकेकडून प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जातो. यंदाही पाणीकपतीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, वळवाच्या पावसाने तलावात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पाणीकपातीच्या संकटातून सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
(कोट)
कासची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली होती. त्यामुळे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनीदेखील प्रतिसाद दिला. तलावात समाधानकारक पाणीसाठा झाला असून, प्रशासनाचे सध्या तरी पाणीकपातीचे कोणतेही नियोजन नाही. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती