पाचगणी : पर्यटननगरी पाचगणीला सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यातच गारा पडल्यामुळे स्ट्रॉबेरीधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पाचगणी परिसरात शनिवारी दुपारी वातावरणात बदल होऊन पावणेचारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने पाचगणी जलमय करून टाकली. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाचगणी परिसरात धुवाँधार पाऊस झाला. गारांसह पडलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. पावसामुळे संपूर्ण शहर व परिसरामध्ये नाले वाहू लागले होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गारा आणि मुसळधार पाऊस यामुळे काही तासातच पाचगणीचे वातावरण पूर्णत: थंड झाले होते. या अवकाळी पावसाने पाचगणीचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
गारांच्या या पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसणार आहे. पिकावर बुरशी व करपा रोग पडण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच दोन दिवसांपासून ढगाळ असणारे वातावरण शनिवारी पडलेल्या पावसाने थंड झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या पाचगणीकरांना दिलासा मिळाला.
...................................................