किडगाव : संपूर्ण सातारा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी राजा सुखावला असला तरी त्यांच्यामध्ये कभी खुशी कभी गम, अशी अवस्था पाहायला मिळत आहे.त्याला कारणही तसेच आहे. जून महिन्यात पावसाची वाट बघून शेतकरी राजा कंटाळा होता. धूळवाफेत पेरणी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसामुळे रखडल्या आहेत.जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अचानकपणे पाऊस सुरू झाला. गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. या पावसाने डोंगर भागातील छोटे-मोठे पाझर तलाव भरल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आलेला आहे.
विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. येत्या चार दिवसांत पावसाने उघडीप दिल्यास उरलेल्या सोयाबीन, भात तसेच भुईमूग पिकांची पेरणी करता येणार आहे. पावसाने उघडीप न दिल्यास यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट होऊ शकते, असे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे.
ज्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, समाधानकारक पाऊस बरसल्याने शेतकºयांचे चेहरे फुलले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांची पेरणी खोळंबल्याने त्यांचे चेहरे केविलवाणे झाल्याचे दिसत आहेत. पश्चिम भागातील लोकांना यावर्षी तरी दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.
कण्हेर धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल आणि पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्याला या पाण्याचा वापर होऊ शकेल. पश्चिमेकडे पडणारा पाऊस पूर्वेकडील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरत आहे. नेले किडगाव, धावडशी, माळेवाडी, वेळेकामठी, कळंबे या परिसरातील शेतकरी राजा पावसामुळे सुखावलेला आहे.