सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे. रविवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक २२ मिलिमीटर पाऊस झाला तर कोयना धरणात ४२.३७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
जिल्ह्यात १० दिवसांपूर्वी पश्चिम भागात धुवाँधार पाऊस झाला होता. त्यानंतर गेल्या शनिवारपासून पावसाचा जोर कमी झाला. सध्या पावसाची उघडझाप सुरू आहे. तसेच कोयनासह प्रमुख धरण परिसरातही पावसाची अत्यल्प हजेरी आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात १४ तर यावर्षी जूनपासून ९१२ मिलिमीटर पाऊस झाला. नवजाला १७ तर यावर्षी आतापर्यंत १०४९ आणि महाबळेश्वर येथे सकाळपर्यंत २२ व जूनपासून १,१९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात अधिक पाऊस महाबळेश्वरला पडला आहे.
दरम्यान, रविवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४२.३७ टीएमसी पाणीसाठा झाला होता तर ६२१८ क्सुसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मागील १० दिवसांपासून हा विसर्ग सुरू आहे.
चौकट :
साताऱ्यात शिडकावा...
सातारा शहर व परिसरात मागील पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. तर रविवारी सकाळपासून पावसाचा शिडकावा होत होता. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात पाऊस झाला. पण, पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
........................................................