लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : मायणी परिसरामध्ये गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. वादळामुळे वडूज रस्त्याजवळचे झाड विजेच्या तारांवर पडल्यामुळे गावाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या तीन-चार दिवसांपासून परिसरामध्ये दुपारच्या वेळेत ढगाळ वातावरण निर्माण होत होते. मात्र, प्रत्येक वेळी पाऊस हुलकावणी देऊन जात होता. आज, गुरुवारी मात्र साडेतीनच्या सुमारास परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह आलेल्या गारांचा पाऊस झाला.
वादळी वाऱ्यामुळे येथील वडूज रोडलगत असलेल्या नदाफ कॉलनीमध्ये झाड वीजपुरवठा करणाऱ्या तारांवर पडल्यामुळे सुमारे दोन तास गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नदाफ काॅलनी परिसर, शिंदेवाडी रोडलगत व काबुगडे वस्ती परिसरातील वीजवाहक तार तुटून या भागातील वीजपुरवठा खंडित ठेऊन इतर भागांतील वीजपुरवठा वीज कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून सुरळीत केला.
वादळी वाऱ्यासह झालेल्या या उन्हाळी पावसामुळे परिसरामध्ये गारवा पसरला होता. मात्र, त्याच दरम्यान परिसरामध्ये असलेल्या हापूस, बदाम, केशर व गावरान आंब्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या उन्हाळी पावसामुळे ‘थोडी खुशी, थोडा गम’ असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे.
चौकट
वादळी वाऱ्याने वीजवाहक तारेवर झाड पडले त्यामुळे तारा तुटल्याने नदाफ कॉलनी परिसरातील डीपी बंद ठेवला तर शिंदेवाडी व काबुगडे परिसरातील तारा तुटल्याने या भागातील वीजपुरवठा ही काही काळासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती वायरमन ज्ञानेश्वर दोडके यांनी दिली.
फोटो संदीप कुंभार यांनी मेल केला आहे.
मायणी येथील वडूज रस्त्याला असलेल्या नदाफ कॉलनी परिसरामध्ये विजेच्या तारांवर झाड पडले होते. त्यामुळे काहीकाळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. (छाया : संदीप कुंभार)