सांगली : जिल्ह्यातील बहुतांश भागाला पूर्वा नक्षत्राच्या पावसाने बुधवारी झोडपून काढले. यामुळे दुष्काळाच्या भयाने आलेली निराशा कमी होण्यास मदत झाली आहे. मिरज, शिराळा, वाळवा, आटपाडी तालुक्यांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सांगलीतही मुसळधार पाऊस झाल्यामुळे स्टेशन चौक, शिवाजी मंडई परिसरात गुडघाभर पाणी साचून राहिले होते. सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एक मोठा वृक्ष कोसळला. या झाडाखाली सापडून दोन चहाच्या टपऱ्यांसह एका दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाळवा तालुक्यात बुधवारी दुपारी २ वाजल्यापासून पावसाने सुरुवात केली. हा पाऊस दोन तास पडत होता. या पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचून राहिले होते. वाळवा तालुक्यातील वाळवा, पेठ, रेठरे धरण, मरळनाथपूर, कामेरी, येडेनिपाणी, येलूर, नेर्ले, कासेगाव, शिरटे, येडेमच्छिंद्र, बहे, रेठरे हरणाक्ष, गोटखिंडी, आष्टा येथेही पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद व परिसरातील सर्व गावांना बुधवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजेच्या कडकडाटासह पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान दिसत आहे. कुमठे, मतकुणकी, उपळावी, मणेराजुरी, आदी भागातही पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यासही वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपले. दुपारी तीन वाजता पावसाने सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ‘मुसळधार’चा इशारा देशाच्या दक्षिणेकडील भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील ७२ तासांत गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे याच हवामान बदलामुळे पुढील २४ तासांत मुंबईतही चांगला पाऊस अपेक्षित आहे, असे स्कायमेटने म्हटले आहे. ४० घरांना पाण्याचा वेढा सांगलीत शिवाजी पुतळा, शिवाजी मंडई, स्टेशन चौक, मित्रमंडळ चौकात पाणी साचून राहिले होते. शिवाजी मंडई परिसरात गुडघाभर पाणी साचले होते. पावसाच्या पाण्याने शेरीनाला भरून वाहत होता. यामुळे शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळत आहे. संजयनगर येथील जगदाळे प्लॉटमधील ४० घरांना पाण्याने वेढले आहे. मिरज शहरात दुपारी वाऱ्यासह पाऊस झाला. शिराळा, कोकरूड, चरण, मांगले, शिरशी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली.
पावसाने धुऊन काढली निराशा
By admin | Published: September 10, 2015 12:39 AM