सातारा : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा बरसायला सुरू केली असून, धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळत आहेत.
मान्सूनचे वेळेत आगमन झाले असताना सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला. दुष्काळी भागातही पाणी वाहिले. पण त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे ढग दाटून आले. खरीप हंगामातील पेरणी वेळेत होणार का, याकडे लक्ष लागले होते. आता काही दिवसांच्या दडीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. सातारा शहरासह परिसरात शनिवारी सायंकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. सोमवारी सकाळीही हलकासा पाऊस झाला. तर दुष्काळी भागातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
पावसाचा खरा परिणाम होतो तो धरणातील पाणीसाठ्यावर. पाऊस वेळेत झाला साठ्यात वाढ होऊन धरणे लवकर भरतात. यंदा अद्यापही धरणात पाण्याची आवक झालेली नाही. असे असले तरी सध्या सुरू असलेल्या पावसाने रात्रीपासून धरणक्षेत्रात हळूहळू जोर धरल्याचे दिसत आहे. यामुळे लवकरच धरणात पाण्याची आवक होण्यास सुरुवात होणार आहे.कोयनानगर येथे सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत ३१ मिलीमीटर पाऊस झाला. तर रविवारी सकाळपर्यंत येथे अवघा १४ मिलीमीटर पाऊस झालेला. त्यामुळे कोयना परिसरात पाऊस जोर धरत असल्याचे दिसत आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊसधोम ०६ (५३)कोयना ३१ (३४७)बलकवडी १९ (१४७)कण्हेर ०५ (३३)उरमोडी १० (४३)तारळी ३० (८३)