सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाने काहीसी उघडीप दिली असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयना धरणात १०३.२० टीएमसी इतका साठा झाला होता. तर धरणाच्या पायथा वीजगृहातूनच पाणी सोडणे सुरू आहे. उरमोडी धरणातून १५९०, तारळीतून १४७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात अपवाद वगळता पावसाने उघडीप दिली आहे. तरीही धरणात पाण्याची आवक कमी होत असल्याने पाणी सोडण्यात येत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात १४ मिलीमीटर पाऊस पडला. धरणाच्या दरवाजातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.
सध्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात १४०८८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कण्हेर धरणात १२.७५ टीएमसी साठा असून, ७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कण्हेरमध्ये ९.५५ टीएमसी पाणी असून, ११५४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. बलकवडी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.