सातारा/पाटण : सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. सातारा, पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले असल्याने धरणात ३८.९४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मंगळवारी सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत कोयना येथे ५८, महाबळेश्वरला ६४ तर नवजा येथे ४८ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली होती.कोयना धरणात १ जून रोजी २९ टीएमसी पाणीसाठा होता. तो मंगळवार, दि. २३ रोजी ३८.९४ टीएमसी झाला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये धरणात ९ टीएमसीने वाढ झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे कोयना, मोरणा विभागातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे.त्याने अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. पाटण तालुक्यातील चिटेघर, मोरणा-गुरेघर, उत्तरमांड, तारळी धरणातील पाणीपातळीही वाढली आहे. सातारा शहरातही मंगळवारी पावसाचा जोर वाढला. दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे शहरातील मुख्य रस्तेही ओस दिसत होते. (प्रतिनिधी)पावसामुळे ढासळला पूलवाई तालुक्यातील दह्याट गावाजवळील पुल मंगळवारी एका बाजूने कोसळला. परिणामी, या मार्गावरील दळणवळण पुर्णपणे ठप्प झाले असून एसटी व इतर वाहतूकही विस्कळीत झाली आहे. धोम धरणाच्या दुतर्फा डोंगराकडेला अनेक गावे आहेत़ या गांवाना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे़ वाईच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दह्याट गावानजीक असलेला पुल मंगळवारी ढासळल्याने या दळवळणावर परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात पावसाचा ‘पॉवर प्ले’
By admin | Published: June 23, 2015 11:48 PM