सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असून बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ७ तर नवजाला १० मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. सध्या धरणात ९६.८६ टीएमसी साठा असून टक्केवारी ९२.३ होती. दरम्यान, सातारा शहरात ऊन पडले होते.सातारा शहरासह पश्चिम भागात मागील तीन आठवड्यांपूर्वी पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला कोयनानगर, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस कोसळला. तसेच धरण क्षेत्राही पावसाने धुवाँधार हजेरी लावली. त्यामुळे कोयना, तारळी, धोम, उरमोडी, बलकवडी, कण्हेर यासारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.
परिणामी धरणे भरू लागली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या कोयना धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तर इतर धरणांमधून काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे.दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ७ आणि आतापर्यंत ४०५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच नवजाला सकाळपर्यंत १० आणि जूनपासून आतापर्यंत ४६०६ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ७ आणि यावर्षी आतापर्यंत ४४५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप कायम आहे. सातारा शहरात तर बुधवारी सकाळपासून ऊन पडले होते. तसेच शहरात तीन दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे.