सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरुच असून कोयना धरणक्षेत्रातही चांगली हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असल्याने कोयनेतून पुन्हा विसर्ग होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून परतीचा पाऊस पडत आहे. पूर्व दुष्काळी भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तरीही काही भागात मोठ्या पावसाची गरज आहे. तरच पाझर तलावात पाणीसाठा होऊ शकतो. तर पश्चिम भागातही पाऊस पडतोय. त्यामुळे धोम, बलकवडी, कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांत पाणी आवक होत आहे. परिणामी धरणांतील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागत आहे.शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला २२ मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे २३ आणि महाबळेश्वरला १७ मिलीमीटरची नोंद झाली. तर जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे ४६०७, नवजा ५६५० आणि महाबळेश्वरमध्ये ६०६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०४.७१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात २७२६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरण ९९.४९ टक्के भरले असून आणखी पाऊस झाल्यास धरणातून पुन्हा विसर्ग करावा लागणार आहे.
कोयना धरण क्षेत्रात पाऊस, विसर्ग सुरु होण्याची शक्यता
By प्रशांत कोळी | Published: October 14, 2022 2:39 PM