सातारा : जिल्ह्यात पश्चिम भागात कमी-अधिक फरकाने पाऊस सुरू असून पूर्व दुष्काळी भागात मात्र प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अजूनही टॅंकर सुरू आहे. विशेष करुन माणमधील स्थिती गंभीर असून जवळपास निम्मा तालुका तहानलाय. तर जिल्ह्याचा विचार करता ५७ गावे आणि २७१ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षे धुवाॅंधार पाऊस झाला. त्यातच जलसंधारणाची कामे झाल्याने पाणी अडले. त्यामुळे दुष्काळी भागातही टंचाईची स्थिती फारशी जाणवली नाही. यंदा मात्र, उन्हाळी पाऊस कमी झाले. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला. तरीही या पावसात म्हणावा असा जोर नाही. पश्चिम भागातच आतापर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. मात्र, दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात पर्जन्यमान कमी राहिले. परिणामी अजूनही अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर धुरळा उडवत फिरत आहेत.जिल्ह्यात अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. यापुढे आणखी काही दिवस पाऊस झाला नाहीतर टॅंकरच्या संख्येत वाढ होऊ शकतो. अधिक करुन माण तालुक्यात टंचाई वाढण्याची शक्यता अधिक आहे.
पश्चिमेकडे पाऊस; पूर्वेकडे टॅंकरचा धुरळा; सातारा जिल्ह्यातील स्थिती
By नितीन काळेल | Published: July 11, 2023 5:35 PM