सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ५०, तर नवजा येथे ६१ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयनेत पाण्याची आवक होत असून, धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर आणखी वाढल्यास कोयनेतून पुन्हा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. कधी दमदार पाऊस झाला, तर काहीवेळा तुरळक स्वरुपात हजेरी लावली. तरीही या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वेकडील दुष्काळी भागातही पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. बाजरी, मूग, मटकी, मका आदी पिके चांगली आली आहेत. ही पिके काढणीच्या टप्प्यात आली आहेत. तसेच काही भागात काढणी आणि मोडणीही सुरू झाली आहे.
पश्चिमेकडेही पावसाची चांगली बरसात झाली. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली आणि तापोळा भागात सतत १५ दिवस पाऊस होता. त्यानंतर काही दिवस तुरळक हजेरी लावली. पण, दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस वाढू लागला आहे. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी अशा प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढत चालला आहे. सर्व प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत.
महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०३ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. परिणामी मागील आठवड्यापूर्वी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सर्व सहा दरवाजांतून विसर्ग करावा लागला. त्यावेळी ५० हजार क्युसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात जात होते. त्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर दरवाजे व पायथा वीजगृहातील विसर्ग बंद करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास आणखी पाणी सोडावे लागणार आहे.
चौकट :
पूर्व भागात पाऊस कमी...
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. या पावसाचा जोर वाढत चालला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ५० मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ४,२७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला ६१ आणि यावर्षी आतापर्यंत ५,६०८, तर महाबळेश्वरला ४० आणि जूनपासून ५,६७८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.
.................................
तीन धरणांतून विसर्ग...
मागील काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणात पाणी येत आहे. परिणामी धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यातच आताही पाऊस होत आहे. यामुळे सद्यस्थितीत तीन धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये धोममधून ३७५ क्युसेक, कण्हेर ३२४ आणि बलकवडी धरणातून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना, तारळी, उरमोडी धरणातून पाणी सोडणे बंद आहे.
........................................................