सातारा : कोयना परिसरात उघडीप दिलेल्या पावसाने नऊ दिवसानंतर हजेरी लावली. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ९८.५७ टीएमसी इतका साठा आहे.जून महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पश्चिम भागासह पूर्वेकडेही पावसाने दमदार हजेरी लावली. तर जुलै महिन्यापासून सतत दोन महिने पाऊस पश्चिम भागात पडत होता. संततधार पावसामुळे धरणे वेळेत भरली.
धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी पाणी सोडण्यात आले. तर कोयना धरणात १०४ टीएमसीच्यावर साठा झाला होता. मात्र, सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा १०० टीएमसीच्या खाली आला आहे. त्यातच गेल्या १८ सप्टेंबरपासून पावसाने कोयना धरण परिसरात पूर्णपणे उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी सुरू होती. असे असतानाच बुधवारपासून कोयना धरण परिसरात पाऊस सुरु झाला आहे.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७ तर यावर्षी आतापर्यंत ५३४९ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. धरणात ९८.५७ टीएमसी साठा असून ८२२ क्युसेकची आवक होत असून ११०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.कोयनेप्रमाणेच नवजा येथेही अनेक दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आहे. २४ तासांत नवजा येथे ९ तर आतापर्यंत ५९२१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. महाबळेश्वरला पावसाची नोंद झाली नाही. तेथे आतापर्यंत ५१०१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पूर्व भागातील माण तालुक्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.