सातारा : साताऱ्यासह महाबळेश्वरमध्ये आज (गुरुवारी) दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. सातारा शहरात अनेक दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली असली तरी सातारकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने दडी मारली. कोयनाबरोबरच सर्वच धरणांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे विविध ठिकाणी पावसासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. सातारा शहरात गुरुवारी सकाळीपासूनच काळे ढग जमा झाले होते. सकाळी अकरानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुपारी एक पर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर साडेतीननंतर पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. महाबळेश्वर व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता.शुक्रवारी बेंदूर सण साजरा होत आहे. दोन वर्षांपूर्वी माण तालुक्यातील शेतकऱ्यांना बेंदूर सण चारा छावणीत साजरा करावा लागला होता. याची आठवण यानिमित्ताने झाली. गुरुवारी सणाच्या खरेदीसाठी सातारा शहरात ग्रामीण भागातून शेतकरी आले होते. पावसाची रिमझिम सुरू होतीच मात्र, त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला नाही. शेतकऱ्यांनी भरपावसात आपल्या लाडक्या बैलांना सजविण्यासाठी बाजारात विविध वस्तू खरेदीचा आनंद लुटला.गुरुवारी कोयनेत ४ मिली मीटर पावसाची नोंद झाली तर नवजा येथे १५ मिमी, महाबळेश्वर येथे आज दिवसभरात २१ मिमी. पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असून हे प्रमाण असेच राहिले तर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले, असे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
साताऱ्यासह महाबळेश्वरमध्ये पावसाची रिमझिम
By admin | Published: July 11, 2014 12:37 AM