रामापूर : पाटण तालुक्यात सर्वत्र पावसाचा कहर सुरूच आहे. तालुक्यात सरासरी ४०० मि. मी. पाऊस पडल्याने पाटण तालुक्यातील कोयना, केरा, मोरणा, काजळी, काफना, तारळी, वांग या महत्त्वाच्या नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. या नद्यांवर असणाऱ्या धरण परिसरातदेखील जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्व धरणांतून पाण्याचा विसर्गदेखील होत असल्याने या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पाटण तालुका हा पावसाचे आगार म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात परिचित आहे. मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यातील भात लावणी लांबणीवर पडली. मात्र, सोमवारपासून तालुक्यात पावसाने जोरदार सुरूवात केल्याने तालुक्यातील भात लावणीला वेग आला होता. मात्र, मंगळवार, बुधवार या दोन दिवसांत तालुक्यात पावसाने कहर करत तालुक्यात सर्वत्र जोरदार सुरूवात केली. त्यामुळे तालुक्यातील कोयना, केरा, मोरणा, काजळी, काफना, तारळी, वांग या महत्त्वाच्या नद्या दुथडी भरून धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. याबरोबरच कोयना धरणातून २१०० क्युसेक्स, मोरणामधून ५८०० क्युसेक्स, तारळी धरणातून ८००० क्युसेक्स, उत्तरमांड मध्यम प्रकल्पातून २५९० क्युसेक्स पाणी नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोयना, मोरणा, तारळे, उत्तरमांड येथील नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदी आणि ओढ्याकाठी असणाऱ्या शेतीचे नुकसान झाले आहे. मोरणा विभागातील गोकुळचा पूल तर मूळगाव, जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतीची कामेदेखील थांबली आहेत.