सातारा : सातारा शहरासह पश्चिमेकडील घाटक्षेत्रातही पावसाची उघडझाप सुरू झाली असून २४ तासांत नवजा येथे ४३ तर महाबळेश्वरला २० मिलिमीटरची नोंद झाली. तर या वर्षात आतापर्यंत नवजा येथे ४ हजार ९१० मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. त्याचबरोबर कोयनेचे दरवाजे बंद केल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत चालली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ८६.७८ टीएमसी साठा झाला होता.जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पाझर तलाव आणि धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखी धरणे ८० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच मागील पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत गेला. तर मंगळवारपासून उघडझाप सुरू झालेली आहे. यामुळे धरणांतही आवक कमी होत आहे. परिणामी सर्वच प्रमुख धरणाच्या दरवाजातून होणारा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा १६ मिलिमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून आतापर्यंत ४ हजार १९० मिलिमीटरची पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरलाही आतापर्यंत ४ हजार ६५० मिलिमीटर पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत पाऊस होतो. त्यामुळे प्रमुख धरणे भरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर कोयना धरणात सकाळच्या सुमारास १० हजार ७२२ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात ८६.७८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ८२.४५ टक्केवारी पाणीसाठ्याची आहे. तर मंगळवारपासून कोयना धरणाच्या दरवाजातून विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सध्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग होत आहे.
सातारा शहरात सकाळपासूनच उघडीप..सातारा शहर आणि परिसरात मागील १५ दिवसांत जोरदार पाऊस झाला होता. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले. पण, चार दिवसांपासून पाऊस कमी झाला. तर बुधवारी सकाळपासूनच पावसाची उघडीप होती. तसेच काहीकाळ सूर्यदर्शनही झाले.