सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असून सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १३३ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने दीड हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर २४ तासांत कोयना धरणात एक टीएमसीने साठा वाढला आहे.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे. कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर, कोयना, नवजासह संपूर्ण कांदाटी खोरे चिंब झाले आहे. आतापर्यंत या भागात गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तरीही ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. तसेच प्रमुख धरणातही हळूहळू पाण्याची आवक वाढत आहे. असे असतानाच या भागात मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झालेला. त्यानंतर दोन-तीन उघडझाप सुरू होती. मात्र, शनिवारी सायंकाळपासून पश्चिम भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस सुरू असल्याचे दिसून आले आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजा येथे १३३ आणि महाबळेश्वरमध्ये ४४ मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १०७२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजा येथे १५५९ आणि महाबळेश्वरला १५१७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.कोयना धरणात एका दिवसांत जवळपास एक टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणाणत २५.८९ टीएमसी पाणीसाठा झालेला. तर धरणात आवक वाढली असून १० हजार ६९४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्याचबरोबर धरणातील विसर्ग आठवड्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयनेत एक टीएमसी पाणीसाठा वाढ
By नितीन काळेल | Published: July 17, 2023 11:48 AM