सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेला ५१, नवजा ५६ आणि महाबळेश्वरला सर्वाधिक ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर कायम असून, त्यामूधन ३१,१६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. पूर्व भागापेक्षा पश्चिमेकडे जोर अधिक होता. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर या भागात तर बुधवारपासून शुक्रवारपर्यंत धुवाँधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदी, नाले एक झाले. कृष्णा, वेण्णा, कोयनासह पश्चिम भागातील अन्य नद्यांना महापूर आला. त्याचबरोबर कोयना, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम, बलकवडी या प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी वाढण्याचा विक्रम झाला. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होत गेला. मागील तीन दिवसात जेमतेम पाऊस झाला. असे असतानाच पश्चिम भागात सध्या पावसाचा जोर हळूहळू वाढत चालला आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ५१ तर १ जूनपासून २,९६४ मिलिमीटर पाऊस झाला. नवजाला सकाळपर्यंत ५६ व यावर्षी आतापर्यंत ३,८०० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला ९९ आणि जून महिन्यापासून ३,८३५ मिलिमीटर पाऊस झाला. सकाळी आठच्या सुमारास कोयना धरणात ३२,२६६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती तर धरणात ९०.८८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. त्याचबरोबर चार दिवसांपासून धरणाचे सहा दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ३१,१६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. कोयनेतून सर्व मिळून ३३,२६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. हे सर्व पाणी कोयना नदीत जात असल्यामुळे कोयनेला पूर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
.......
चौकट :
प्रमुख धरणांतील विसर्ग (सकाळी आठची आकडेवारी)
धोम धरणातून २,१७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. तर कण्हेर २,३७६ क्युसेक, कोयना ३३,२६६, उरमोडीतून १,२३४ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात होते. दरम्यान, धोम धरण ७६.३१ टक्के भरले आहे तर कण्हेर ७८.२६ टक्के, कोयना ८५.६७ टक्के आणि उरमोडी धरणात ७४.४६ टक्के पाणीसाठा झाला होता. इतर धरणांमधील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे.
.................................................................