सातारा : सातारा शहरासह कोरेगाव परिसरात रविवारी रात्री आठ-साडेआठ या वेळेत वादळी वार्यासह पाऊस झाला. सातारा शहरात विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहिल्याने निसर्गाचे रौद्ररूप अनेकांनी ‘याची देही, याची डोळा’ पाहिले. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने शहरात पाणी-पाणी केले. रविवारी सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सकाळी काही काळ पावसाचा शिडकावाही झाला. दिवसभर उकाड्यामुळे सातारकरांची घामाघूम झाली. रात्री आठच्या सुमारास शहरात जोरदार वारे वाहू लागले. या वार्यामुळे मोठ-मोठाली झाडेही वाकत होती. आकाशात जोरदार विजा कडकडाटत होत्या. वार्यामुळे रस्त्यावरील धूळ सर्वत्र उडू लागली. चक्रीवादळाचा अनुभवच जणू सातारकरांनी यानिमित्ताने घेतला. रात्री आठनंतर वादळी वार्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा भयानक कडकडाट सुरू झाला. तसा पावसाचा जोरही वाढला. सुमारे तासभर हा पाऊस सुरू राहिला. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी-पाणी झाले. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साठून राहिले होते. डोंगरउतारावरून मुख्य रस्त्यांवर दगड-धोंडे व इतर कचरा वाहून आला. काही ठिकाणी रस्तेही खचले. काही परिसरात तर चिखल साठून राहिला होता. या चिखलातूनच वाहने ये-जा करत होती. जोराच्या पावसामुळे शहरात नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठले. वादळी वार्यामुळे वीज गायब झाली. या पावसात आंब्याचेही मोठे नुकसान झाले. जागोजागी आंबे जमिनीवर पडलेले पाहायला मिळत होते. सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान होते. हे वातावरण वळिवाप्रमाणे नसून चक्क पावसाळा सुरू झाल्याचा भास होत होता. अंदमानबरोबरच पावसाळा सातार्यात आला की काय, असेही चेष्टेने बोलले जात होते. दिवसभर ढगांमुळे उकाडा प्रचंड प्रमाणात वाढला होता. परंतु पाऊस पडत नव्हता. सायंकाळच्या वेळी सोसाट्याचा वारा सुटला आणि विजांचा कडकडाट होऊन रात्री पावणेआठच्या सुमारास प्रचंड पावसास सुरुवात झाली. दरम्यान, पावसाळी हवा आणि वीजपुरवठा गायब होणे हे समीकरण रविवारीही कायम राहिले. सायंकाळी सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागताच वीजपुरवठा खंडित झाला. जीवन प्राधिकरणाकडून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम अजूनही अनेक ठिकाणी सुरूच आहे. त्यासाठी खणलेले रस्ते अनेक ठिकाणी नुसते मुरूम टाकून मुजविण्यात आले आहेत. पाऊस सुरू होताच या रस्त्यांवर चिखलाचा थर पसरला. त्यावरून वाहने घसरू लागली. तसेच चालतानाही कसरत करावी लागत होती. त्यातच वीजपुरवठा गायब होऊन अंधार झाल्याने सातारकरांचे अतोनात हाल झाले. सायंकाळच्या पावसाने उकाड्याचा त्रास कमी झाला असला, तरी त्याबरोबरीने खराब रस्ते आणि वीजपुरवठ्यातील व्यत्यय यामुळे नागरिकांना या गारव्याचा आनंद लुटता आला नाही. (प्रतिनिधी)
पावसाच्या रौद्ररूपाने दाणादाण! धूळधाण : वादळी वार्यामुळे रहिमतपूर परिसरात झाडे कोसळून रस्ते बंद
By admin | Published: May 19, 2014 12:11 AM