कोयनानगर : कोयना परिसर व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने कहर केला असून, बुधवारी रात्रीपासून कऱ्हाड-चिपळूण मार्ग बंद आहे. ढगफुटी सदृश पावसाने कोयना भागात शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे.
कोयना भागात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारपासून पावसाने अक्राळविक्राळ रूप धारण करत विध्वंसक स्थिती निर्माण केली आहे. कोयना भागातील शेतात पावसाच्या पाण्यासह नदी ओढ्यांचे पाणी घुसल्याने पिके वाहून गेली तर शेताचे बांध, मोठ्या ताली ढासळल्या आहेत.
कापना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नेचलजवळील पूल पाण्याखाली गेल्याने शेतात काम करणारी माणसे अडकून पडली. तर रात्री दहानंतर पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावर पाणी भरले होते. दोन वाहन चालकांना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहने पाण्यात घातली. मात्र काही अंतरावर गाड्या बुडून गेल्या. यावेळी नंदकुमार सुर्वे व स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन सात जणांचा जीव वाचवला तर वाहनेही पाण्यातून बाहेर काढली.
ढाणकल येथील गगनगिरी आश्रमास कापना नदीच्या पाण्याने वेढा दिला असून आश्रमाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही आश्रम पाण्यातच आहे. कोयनानगर येथील बसस्थानकाशेजारील स्वच्छतागृहावर झाड कोसळले आहे तर कोयना- नवजा मार्गावर ओझर्डे धबधब्याजवळ दरड कोसळली तर कामरगाव येथे मोठे झाड पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. गुहागर-विजयपूर महामार्गाच्या रुंदीकरणाचेही काम रेंगाळल्याने जागोजागी साईटपट्ट्या उरकून ठेवल्याने व रस्त्यावरील जुने पाण्याचे प्रवाह बुजल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. येराड घाटमाथा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत पाणी भरल्याने अनेक ठिकाणी किरकोळ अपघात झाले आहेत. मोठा अपघात होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात मदतीसाठी निघालेली एनडीआरएफची तुकडी कोयनेत अडकली आहे. लवकरच नवजा रस्त्यावरील अडथळा दूर करून मार्गस्थ होणार आहे.
220721\img-20210722-wa0034.jpg
कापना नदीने धोक्याची पातळी ओलाडल्याने कदमवाडी जवळील पुल पाण्याखाली गेला आहे