लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : गोपूजला रविवारी सायंकाळी साडेचार वाजता मुसळधार पावसाने झोडपून काढले. गोपूज-औंध रोडच्या पुलाखालचे पाणी थेट एका घरातील स्वयंपाकाच्या खोलीत घुसल्याने गोपूज येथील म्हामणे कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागला. संबंधित काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला वारंवार पाण्याची व्यवस्था करा, असे सांगूनही उपाययोजना न झाल्याने अडचणीत वाढ झाली.
याबाबत माहिती अशी की, औंध-गोपूज रोडला पुलाचे काम झाले आहे, मात्र औंधला जाताना पुलाच्या उजव्या बाजूस घरे आहेत. तेथे पुलाखालून येणाऱ्या पाण्याचे काहीच नियोजन केलेले नाही. पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला याचे काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पावसाच्या आलेल्या पाण्यामुळे जवळच असणारे शेणखत वाहून गेले. वैरणीच्या गंजीत पाणी घुसले तर त्यानंतर पाण्याला जागा मिळाली नसल्याने थेट किचनमध्ये पाण्याचे उमाळे फुटले. त्यामुळे सदाशिव विलास म्हामणे व त्यांच्या कुटुंबीयांची पळापळ सुरू झाली. सुदैवाने पाऊस थांबल्याने पुढील संकट टळले. मात्र या नुकसानीस कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पुलाच्या बाजूकडील अपुरे काम व बंदिस्त गटारे करून देण्याची मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
पुलाचे काम सुरू झाल्यापासून संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पावसाच्या पाण्याचा धोका सांगितला होता. तसेच कंपनीला अर्जही दिला होता. मात्र काहीही उत्तर आले नाही. या नुकसानीला कोण जबाबदार आहे याचे उत्तर बांधकाम विभागाने द्यावे
- सदाशिव म्हामणे,
गोपूज.
फोटो ३०गोपूज
गोपूज येथे रविवारी चांगला पाऊस झाला. मात्र पुलाखालून येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन झालेले नसल्याने पाणी घरात घुसले. शेणखत वाहून गेले. वैरणही भिजली आहे. (छाया : रशिद शेख)